ये रे ये रे पैसा


 ये रे ये रे पैसा



आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्त्वाची समस्या असते, ती म्हणजे पैशांची समस्या. पैशांची चणचण ही प्रत्येकाला असते, मग तो श्रीमंत असो वा गरीब. आयुष्यातील गरजा भागविण्यासाठी प्रत्येकाला पैशांची गरज भासते आणि म्हणूनच प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे पैसे कमावण्याचा प्रयत्न करतो. काही जण नोकरी करतात तर काहीजण व्यवसाय करतात; काही जण उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, वकील यासारख्या सेवा देतात तर काही जण एकत्र येऊन मोठा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करतात.

जगात सर्वांचे उत्पन्न कधीच सारखे असू शकत नाही. काही लोकांचे उत्पन्न फार कमी तर काही जणांचे फार जास्त असते. उत्पन्नातील ही तफावत आपणास नेहमीच पहावयास मिळते. मग पैशांची समस्या कोणाला असायला हवी? फार कमी कमावणाऱ्या लोकांना पैशांची समस्या असायला पाहिजे. जास्त कमावणाऱ्या व्यक्तींना पैशाची समस्या नसावी. हे सर्वसामान्यांचे मत असते. पण खरी परिस्थिती तशी नसते. पैशांची समस्या ही प्रत्येकाला भासत असते. मग तो दरमहा 10000 कमावत असू दे किंवा एक करोड तो कितीही गरीब असो वा कितीही श्रीमंत कोणीही यापासून अलिप्त नाही.



गरिबांना पैशांची टंचाई असते, हे आपल्याला माहीतच आहे. मात्र मोठमोठे व्यावसायिक स्वतःला कर्जबाजारी घोषित करतात किंवा मोठमोठ्या कंपन्या सुद्धा पैशाच्या अभावी बंद होतात. आपल्या देशात काही अशा प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, ज्या कधीतरी कर्जबाजारी झालेल्या होत्या किंवा झाल्या आहेत. अमिताभ बच्चन शाहरुख खान हेसुद्धा एकेकाळी कर्जबाजारी झाले होते. सध्याच्या काळात विजय माल्या व अनिल अंबानी हे उद्योगपती कर्जबाजारी झाले आहे कारण त्यांनी घेतलेले काही निर्णय चुकीचे होते. म्हणजेच पैशाची समस्या कोणालाही होऊ शकते.

खरं म्हणजे पैशाची चणचण प्रत्येकाला असते, मग तो श्रीमंत असो वा गरीब. याचा अर्थ, ज्याला स्वतःचे पैसे सांभाळता येत नाही, जो प्रमाणापेक्षा जास्त धोका स्वीकारतो किंवा उद्या  येणाऱ्या संकटाचा विचार करून त्याची पूर्वतयारी जो करत नाही, त्यालाच पैशाची समस्या उद्भवू शकते. पैशांच्या समस्येमध्ये दोन प्रकार येतात
  1. पैशाची कमतरता 
  2. अधिक पैशाची समस्या 

गरीब आणि मध्यमवर्ग बरेच वेळा चिंतीत असतात कारण त्यांना पैशाची कमतरता जाणवत असते. घर, वैद्यकीय उपचार, मुलांचे शिक्षण, लग्न या महत्वाच्या गरजांसाठी पैशांची आवश्यकता भासत असते. पण श्रीमंतांचे असे नाही. त्यांच्या या गरजा पूर्ण होऊ शकतात. त्यांना समस्या असते ती, स्वतः कडील पैसा सुरक्षित कसा ठेवता येईल? सुरक्षे सोबत पैसा कसा वाढत राहील? जेणेकरून त्यांना त्यांचे राहणीमान आणि  सोसायटी स्टेटस सांभाळता येईल. गरीब आणि श्रीमंत यामधील पैशांच्या या समस्या हजारो वर्षापासून आहेत आणि यापुढे ही कायम राहतील.

गरीब आणि मध्यम वर्गीय यांचे असे मत असते की, आम्हाला खूप पैसे मिळाले किंवा एखादी करोडो रुपयांची लॉटरी लागली तर त्यांच्या पैशाच्या समस्या दूर होतील. गेल्या वीस वर्षात कौन बनेगा करोडपती मुळे किती करोडपती बनले? रोज लॉटरी काढून किती जण करोडपती, लखपती होतात? मग आज कुठे आहेत ते? त्यांच्या पैशांच्या समस्या ज्या पूर्वी होत्या, त्या पूर्ण करण्यातच त्यांचा सर्व पैसा संपून जातो किंवा त्यांची पैसा सांभाळण्याची क्षमता नसल्यामुळे कोणीतरी त्यांची फसवणूक करते. म्हणून त्यावेळी त्यांच्या या पैशांच्या समस्येमध्ये बदल होतो की, मिळालेल्या पैशांना सुरक्षित कसे ठेवायचे? आणि त्याची वाढ कशी करायची?

खरी समस्या ही आहे की, तुम्ही तुमच्या पैशाच्या समस्यांमधून बाहेर कसे निघू शकता? त्यासाठी तुम्ही काय करता? तुम्ही पैसे हाताळताना योग्य ती काळजी घेतली किंवा तुमच्या विवेक बुद्धीचा योग्य आणि जास्तीत जास्त वापर केलात तर तुम्ही तुमच्या आर्थिक संकटातून मार्ग काढू शकता. आणि जर याबद्दल तुमचे ज्ञान कमी पडत असेल तर तुम्हाला संकटातून बाहेर पडण्यासाठी काही महिने किंवा काही वर्षे सुद्धा लागू शकतात. तसेच काहीजण तर स्वतःला या संकटातून बाहेर पडण्यासाठी अपयशी समजतात. त्यातील अनेक जण डिप्रेशन मध्ये जातात किंवा आत्महत्या करतात.

मग आपण पैशांच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी काय करू शकतो? सर्वप्रथम त्यासाठी प्रत्येकाला पैशांचे महत्व समजून घ्यावे लागेल आणि स्वत: ची आर्थिक क्षमता समजून घेतली पाहिजे. बाजारात पैशांचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक कन्सल्टंट, मॅनेजर आणि ॲडव्हायझर उपलब्ध आहेत. मात्र त्यांनी दिलेला सल्ला योग्य की अयोग्य याचा निर्णय प्रत्येकाला स्वतःलाच घ्यायचा असतो. कारण प्रत्येकाच्या निर्णयाचा त्याच्या स्वतःच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच नेहमी तुम्ही तुमचे आर्थिक ज्ञान वाढविले पाहिजे.



तुम्हाला तुमच्या पैशांसाठी स्वतः  मेहनत घ्यावी लागेल.
  1. तुम्हाला तुमचा पैसा व्यवस्थित हाताळण्यासाठी शिकावे लागले. तुमच्या खर्चावर तुम्हीच ताबा ठेवला आला पाहिजे 
  2. तुम्हाला कर्जाचे चांगले आणि वाईट फरक समजून, त्यातील फायदे आणि तोटे समजून घ्यावे लागतील. कर्जाच्या सापळ्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवावे लागेल. 
  3. तुमचे सध्याचे उत्पन्न किती आहे? त्यात किती आणि कधी वाढ होऊ शकते? याचा अभ्यास करून पैसे कमावण्याचे आणि वाढवण्याचे निरनिराळे मार्ग शोधावे लागतील. 
  4. पुढील येणाऱ्या परिस्थितीचा अंदाज बांधून त्यासाठी तयारी करावी लागेल. जेणेकरून तुम्ही तुमचे अधिक पैशांचे लक्ष गाठू शकता. 
  5. त्याच बरोबर गुंतवणुकीच्या निरनिराळ्या मार्गांचा अभ्यास केला पाहिजे. ज्यामुळे तुम्ही कमीत कमी धोका पत्करून जास्तीत जास्त परतावा घेऊ शकता.

आपल्या आयुष्यात रोज काही ना काहीतरी घडत असते. पण तुम्ही त्यासाठी मानसिक, शारीरिक आणि आर्थिक दृष्ट्या किती तयार आहात? यावर सर्व अवलंबून असते. तुम्ही जितक्या लवकर वरील गोष्टी शिकाल, तितक्या लवकर तुमच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य येईल आणि तुम्ही पैशांच्या विवंचनेतून बाहेर येऊ शकता.







 

Comments